बदलापूर, दि.१८,प्रतिनिधी:कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मालमत्ता कर वसुलीचे ८९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असून, मार्च अखेरपर्यंत १०० टक्के वसुली साध्य करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पावले उचलली आहेत. यासाठी नगरपरिषदेची ८ विशेष वसुली पथके तयार करण्यात आली असून, दि. ०६ मार्च २०२६ पासून शहरात थकबाकीदारांवर थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या पथकांकडून थकबाकीदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देत कर वसुली केली जात आहे. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर पालिकेकडून जप्ती तसेच अटकावणीची कठोर कारवाई केली जात आहे.
दि. ०६ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत एकूण २५ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, तब्बल ५.०९ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे.
दरम्यान, थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी पालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या ‘अभय योजना’ (शास्ती माफी) चा कालावधी ३१ मार्चपर्यंत मर्यादित असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी शहरात विविध ठिकाणी जाहिरात फलक लावण्यात आले असून, ध्वनिक्षेपकासह रिक्षा फिरवून तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.



