साताऱ्याच्या गादीचा शब्द आणि मुख्यमंत्र्यांचा तो एक ‘फोन कॉल’; बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या गडाला सुरुंग, भाजपाचा ऐतिहासिक गुलाल!
विशेष प्रतिनिधी:सातारा: सहकार आणि राजकारणाचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण एका रात्रीत उलटले असून, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या मिनी मंत्रालयावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक निर्णायक फोन आणि त्यानंतर सातारा गादीचे वारसदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टाकलेला ‘धुरंधर डाव’ यामुळे विरोधकांच्या हातातील सत्ता निसटली असून भाजपाने केवळ एका मताच्या फरकाने थरारक विजय मिळवला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भाजपाकडे केवळ २८ सदस्यांचे संख्याबळ होते. दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी विजयाच्या निर्धाराने मैदानात होती. मात्र, मतदानाच्या काही काळ आधी पडद्यामागे वेगाने चक्रे फिरली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली राजकीय जादू दाखवत अतिरिक्त ५ सदस्यांची रसद मिळवली आणि भाजपाचे पारडे ३३ मतांवर नेऊन ठेवले. याउलट महाविकास आघाडीच्या गटाला केवळ ३० मतांवर समाधान मानावे लागले.
या ऐतिहासिक सत्तांतरामुळे भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी, तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. साताऱ्यासारख्या शरद पवारांच्या प्रभावाखालील जिल्ह्यात भाजपाने मिळवलेला हा विजय केवळ सत्तापालट नसून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना दिलेला मोठा धक्का मानला जात आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या सूक्ष्म नियोजनाने साताऱ्याच्या राजकारणात भाजपाचे कमळ फुलवून दाखवल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आल्याने आता साताऱ्याच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन आणि शिवेंद्रसिंहराजेंची रणनीती या ‘डबल इंजिन’ जोडीने साताऱ्याचा राजकीय पोत बदलल्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.




