वॉशिंग्टन, दि. ९ वृत्तसंस्था:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी भारतावर ५० टक्के आयात शुल्क (Import Duty) लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार संबंधात कटुता निर्माण झाली. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार अनेक महिन्यांपासून खोळंबला आहे.
यादरम्यान अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी भारतावरील आयात शुल्काचे खापर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच फोडले आहे. मोदींनी मौन बाळगल्यामुळेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादल्याचा दावा लुटनिक यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याविषयीचा हा आढावा…
हॉवर्ड लुटनिक यांनी ‘ALL IN’ या पॉडकास्टमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प या व्यापार कराराकडे वैयक्तिक वाटाघाटी म्हणून पाहतात. अमेरिकेच्या कोणत्याही व्यापार धोरणाबाबत अंतिम निर्णय तेच घेत असल्याचे लुटनिक यांनी सांगितले. गेल्या वर्षी अमेरिकेचा भारताबरोबरचा व्यापार करार जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला होता.
त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून थेट फोन कॉलची अपेक्षा होती. व्यापार कराराबाबतच्या सर्व चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असल्याने मोदी आपल्याला फोन करणार असल्याची आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाळगून होते. परंतु पंतप्रधान मोदी यांनी स्वतः ट्रम्प यांच्याशी थेट संपर्क साधला नाही आणि हीच बाब राष्ट्राध्यक्षांना खटकली होती. मोदींच्या या ‘मौनाचा’ फटका भारताला बसला आणि परिणामी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली, असा दावा लुटनिक यांनी केला. पुढील काळात भारतावर आणखीच टॅरिफ लावले जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.




