बदलापूर, दि. २३ प्रतिनिधी:बदलापूरमध्ये शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरडींवर लैंगिक शोषणाची घटना घडली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. सर्वच स्तरातून या घटेनेचा तीव्र स्वरुपाचा निषेध नोंदवण्यात आला.
शाळेच्या व्हॅनमध्ये बसचालकाने एका चार वर्षांच्या निरागस चिमुकलीचे लैंगिक शोषण केले आहे. असा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला असून, या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांना संबंधित आरोपीला अटक केली आहे. त्याला कल्याण कोर्टात हजर केले असता त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत आहे. ती नेहमीप्रमाणे दुपारी साडेबारा वाजेपर्यंत स्कूलव्हॅनमधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईला तिची चिंता वाटू लागली. यानंतर आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर दीड तासांनंतर चिमुकली घरी परतली. त्यानंतर आईने सुटकेचा निश्वास सोडला, पण चिमुकलीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगिल्यानंतर आईने तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेनंतर जनमानसांत संतापाची लाट उसळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित चिमुकलीला मारहाण झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते- सपकाळ
या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत असताना राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना झोप कशी लागते. दीड वर्षापूर्वी बदलापुरात लहान शाळकरी मुलींवर अशीच घटना घडली होती पण सरकारने या प्रकरणातील महत्वाच्या आरोपींना मोकळे सोडले.
भाजपा व संघाशी संबंधित शाळेत घडलेल्या या घटनेत शाळेच्या अध्यक्ष व सचिवावर कारवाई केली नाही. जनतेने रस्तावर उतरून तीव्र आंदोलन केल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली होती पण पुढे या प्रकरणाचे काय झाले, हे राज्याने पाहिले आहे. प्रशासन कामच करत नाही त्यामुळे गुन्हेगारांचे मनौधैर्य वाढले आहे. काल बदलापुरात झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे.



