मुंबईच्या महापौर निवडणुकीत ‘राज’ फॅक्टर संपला? भाजपला पाठिंबा देण्याच्या चर्चांवर ठाकरेंनी कसं ओढलं पाणी?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी महायुतीने कंबर कसली असताना, मनसेचे इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं जाणार का? या प्रश्नाने गेले दोन दिवस मुंबईचं राजकीय वातावरण तापलं होतं. सत्ताधाऱ्यांकडून मनसेला रेड कार्पेट अंथरलं जात असतानाच, राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत या प्रस्तावाचा ‘गेम’ केला आहे. “मी सांगतोय ना, भाजपसोबत जाणार नाही,” या राज ठाकरेंच्या एका वाक्याने युतीच्या सर्व शक्यतांना सध्या तरी सुरुंग लावला आहे.
शेवाळेंचं निमंत्रण अन् मनसेची भूमिका
महापौर निवडीच्या हालचालींना वेग आला असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते महापालिका आयुक्तांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच दरम्यान शिवसेना नेते खासदार राहुल शेवाळे यांनी “मनसे जर महायुतीसोबत आली तर त्यांचं स्वागतच आहे,” असं म्हणत राज ठाकरेंना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साद घातली होती. शेवाळेंच्या या विधानामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून सत्तेच्या वळचणीला जाणार, अशा वावड्या मुंबईभर पसरल्या होत्या.
१२१ विरुद्ध १२८ चा तो आकडा!
सध्याचं महापालिकेतील चित्र पाहिलं तर महायुतीकडे (भाजप, शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी) १२१ नगरसेवकांचं तगडं बळ आहे. अशा स्थितीत मनसेचे ७ नगरसेवक सोबत आले असते, तर हा आकडा १२८ वर गेला असता. यामुळे महापौर निवडीत कोणताही धोका उरला नसता. मात्र, राज ठाकरेंनी या आकड्यांच्या गणितात अडकण्यास नकार दिला आहे.
”मी सांगतोय ना…” राज ठाकरेंचा कडक पवित्रा!
वांद्रे येथील बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज ठाकरे भलतेच आक्रमक दिसले. “तुम्ही भाजपसोबत जाणार का?” यावर त्यांनी सुरुवातीला केवळ ‘नाही’ असं म्हटलं, पण वारंवार तोच प्रश्न विचारला गेल्यावर “मी सांगतोय ना भाजपसोबत जाणार नाही, आता चर्चा संपली,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्णय ठोकून दिला. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे सत्तेच्या ‘मॅजिक फिगर’साठी मनसेची मदत घेण्याचे भाजपचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.
उद्धव ठाकरेंसोबतचा संघर्ष की स्वाभिमानाची लढाई?
निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू महायुतीविरोधात लढले आहेत. अशा वेळी राज ठाकरे जर भाजपच्या गोटात सामील झाले असते, तर त्याचा सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसला असता. पण, राज ठाकरेंनी सध्या तरी सत्तेत वाटा घेण्यापेक्षा विरोधात बसून आपली स्वतंत्र ओळख जपण्याला महत्त्व दिलं आहे. यामुळे महाविकास आघाडीला राजकीय बळ मिळालं असून, राज ठाकरे भविष्यात कोणती चाल खेळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आता महापौर कुणाचा?
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला नवा महापौर मिळेल हे आता स्पष्ट आहे. राज ठाकरेंनी ‘नाही’ म्हटलं तरी महायुतीचा १२१ चा आकडा बहुमताच्या ११४ पेक्षा मोठा आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर बसणार हे जवळपास निश्चित असलं, तरी राज ठाकरेंनी साथ नाकारल्यामुळे महायुतीला आता आपल्याच बळावर ही लढाई लढावी लागणार आहे.




