टोलवसुलीत तत्परता दाखवणाऱ्या सरकारकडे आपत्ती काळात रस्ता मोकळा करण्यासाठी ‘कृती आराखडा’ का नाही?
मुंबई विशेष प्रतिनिधी:मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांचे जे हाल झाले, त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘रस्ता बांधणे आणि टोल वसूल करणे इतकेच सरकारचे काम आहे का?’ असा उद्विग्न सवाल करत, त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर बोट ठेवले आहे.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या अपघातानंतर सुरक्षेसाठी वाहतूक थांबवणे गरजेचे होते, मात्र रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा करायला ३२ तास का लागतात, याचे उत्तर सरकारकडे नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महामार्गाला २४ वर्षे झाली, तरीही अशा आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडे कोणताही ‘कृती आराखडा’ (Action Plan) तयार नाही, याबद्दल राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. सरकार केवळ टोलवसुलीत तत्परता दाखवते, पण सुविधा आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करते, असा आरोप त्यांनी केला.
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “नव्या घोषणा करण्याआधी सध्याचा प्रवास तरी सुरळीत करा. मुंबई आणि पुणे ही राज्याच्या विकासाची इंजिनं असताना, दोन शहरे ३२ तास तुंबून राहतात आणि सरकार केवळ चौकशीचे आदेश देऊन शांत बसते, हा कोडगेपणा आहे.” मनसेचे टोल आंदोलन हे नेहमीच प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधेसाठी होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
या ३२ तासांच्या कोंडीत ज्या प्रवाशांकडून टोल वसूल केला गेला, तो सरकारने परत करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच पालकमंत्रिपदावरून भांडणाऱ्या सरकारमध्ये जनतेला कोणीही वाली उरला नाही, अशी भावना निर्माण होत असून सरकारने चौकशीचे नाटक न करता भविष्यातील अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, हे स्पष्ट करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
—
Deepak Kaitke




