जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव
नवी मुंबई दि. १० प्रतिनिधी,धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार सोहळा तसेच नवप्रेरणा कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४–५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. धगधगती मुंबई हे वृत्तपत्र गेली सोळा वर्षे अखंडपणे जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारे माध्यम म्हणून कार्यरत आहे.
दरम्यान, धगधगती मुंबई २०२६ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सामाजिक सेवेबद्दल समाजरत्न पुरस्कार धारावीचे समाजसेवक रमेश कदम, समाजभूषण पुरस्कार उन्नतीचे चेअरमन हनुमंत रांजणे आणि कोपरखैरणे येथील समाजसेवक वसंत जाधव (सर) यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक रत्न पुरस्कार प्रताप महाडिक, साहित्यरत्न पुरस्कार डॉ. शांताराम कारंडे, युवा राजकीय रत्न पुरस्कार नवनिर्वाचित नगरसेवक गणेश सकपाळ (घणसोली), उद्योगरत्न पुरस्कार सौ. अनुजा कौतिक दांडगे (महाराष्ट्र बाजार पेठ) तसेच उद्योजक के. के. शेलार यांना देण्यात येणार आहे. वैद्यकीय रत्न पुरस्कार नवी मुंबईतील प्रसिद्ध हाडवैद्य डॉ. सचिन वरखडे आणि एमबीबीएस डॉ. सुरज प्रकाश पाटील यांना जाहीर झाला आहे.
कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना कलारत्न पुरस्कार तर लोककलावंत योगेश चिकटगावकर यांना कला गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
कायद्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी नवी मुंबईतील अॅड. मनीषा योगेश चव्हाण यांना कायद्यारत्न पुरस्कार, सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांना सहकारत्न पुरस्कार, तर दलित मित्र पुरस्कार मुंब्रा-ठाणे येथील ज्येष्ठ नगरसेवक राजन नारायण कीने यांना जाहीर करण्यात आला आहे.
तसेच उत्कृष्ट संस्था म्हणून सुका व ओला कचरा वेगळा करून कचरा व्यवस्थापनाबाबत समाजप्रबोधन करणाऱ्या संगम प्रतिष्ठान या संस्थेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय नऊ कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
सदर सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत.



