नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल; कणकवलीतील ‘त्या’ भावनिक भाषणाने प्रकृतीबाबत वाढवली चिंता?
विशेष प्रतिनिधी:राजकीय आखाड्यात कधीही न थकणारा योद्धा म्हणून ओळखले जाणारे भाजप खासदार नारायण राणे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयाशी संबंधित त्रासामुळे रुग्णालयात आणण्यात आले असून, सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कोकणासह महाराष्ट्रातील त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नुकत्याच कणकवलीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात नारायण राणे यांचे अत्यंत वेगळे आणि भावनिक रूप पाहायला मिळाले होते. स्थानिक नगरपंचायत निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना राणे म्हणाले होते की, “आता थकलो आहोत, आणि किती करणार? याला काही मर्यादा असतात.” अनेक दशकांपासून राजकारणात सक्रिय असणाऱ्या राणेंच्या या विधानाने तेव्हाच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. आपल्या मुलांबद्दल बोलताना त्यांनी “ती मुले कर्तृत्ववान आहेत, त्यांना आशीर्वाद देताना मी ‘नांदा सौख्य भरे’ एवढीच इच्छा व्यक्त करतो,” असे म्हणत निवृत्तीचे जणू सूचक संकेतच दिले होते.
या कार्यक्रमानंतर काही दिवसांतच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने, वाढता ताण आणि थकवा यामुळे प्रकृतीवर परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, राणे यांच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असून, प्रखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राणे साहेब लवकर बरे होऊन पुन्हा सक्रिय व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे.




