सलमानच्या ‘संघ’वारीवर गदारोळ कशासाठी? एकनाथ शिंदेंनी घेतली ‘भाईजान’ची बाजू; टीकाकारांना सुनावले खडे बोल!
विशेष प्रतिनिधी:बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात वादाचे मोहोळ उठले आहे. या वादात आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली असून, त्यांनी सलमान खानची खंबीर पाठराखण केली आहे. “सलमान खानने एका देशप्रेमी संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, तर त्यात पोटशूळ उठण्याचे कारण काय?” अशा शब्दांत शिंदेंनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा जाहीर गौरव केला. ते म्हणाले की, “आरएसएस ही शंभर वर्षांपासून निस्वार्थ भावनेने देशसेवा करणारी राष्ट्रभक्त संस्था आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट येते, तेव्हा संघाचे स्वयंसेवक स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीला धावून जातात. अशा शिस्तबद्ध आणि देशभक्त संस्थेबद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही.” सलमानने या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या नागरिकत्वाचा आणि संस्कृतीचा आदरच केला असल्याचे शिंदे यांनी ठामपणे मांडले.
‘तो भारताचा नागरिक आहे, परका नाही’
सलमान खानच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. “सलमान खान हा भारताचा जबाबदार नागरिक आहे आणि येथील परंपरा मानतो. मुंबईत कार्यक्रम असताना त्याने तिथे जाणे हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे. यात काहीही गैर नाही,” असे सांगत शिंदेंनी सलमानच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले.
सलमान खानच्या या ‘संघ’वारीमुळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे चर्चेला नवे वळण मिळाले आहे. एकीकडे सलमानच्या या पावलाकडे नव्या सामाजिक समीकरणाच्या दृष्टीने पाहिले जात असताना, शिंदे यांच्या समर्थनामुळे महायुती सरकारची या विषयावरील भूमिकाही स्पष्ट झाली आहे.
—
Deepak Kaitke




