नागपूर मनपा

मनपाचे भूखंड फ्री होल्ड करण्यासाठी दटकेंचा पाठपुरावा

मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेत बैठकीत मिळाली गती

नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान प्रवीण दटके यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी नागपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीच्या अभिन्यासातील भाडे पट्यावर देण्यात आलेले भूखंड मालकी हक्काने देणेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या लक्षेवधी दरम्यान नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नसल्याने शंभूराज देसाई यांनी बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीत कॅबिनेट समोर विषय मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान प्रवीण दटके यांनी बैठकीत सविस्तर मांडणी केली. महापालिकेच्या ताब्यात एकूण 22 अभिन्यास असून 7 अभिन्यास हे 30-40 वर्षांपूर्वीचे तर 15 अभिन्यास हे नागपूर महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजे 90 वर्षांपूर्वीपासून भाडेपट्याने दिले आहेत. भुखंड मागणीनुसार देण्यात आले असून काही भूखंड हे निवासी वापरासाठी देण्यात आले आहेत. भुखंड देताना नागरिकांकडून प्रीमियम घेण्यात आले असून बाजारभावाच्या किंमतीत रक्कम आकारण्यात आल्याची माहिती दटके यांनी दिली. महसूल विभागाने नझूल जमिनी फ्री होल्ड करण्याबाबत जे धोरण वापरले त्याच धोरणाचा विचार करण्याची सूचना दटके यांनी केली.

यावेळी, राज्यातील इतर जिल्हात फ्री होल्डसाठी केलेल्या कार्यवाहीचा अभ्यास करून तसेच नागपूर आणि अमरावती विभागात अंमलात आणलेल्या नझूल धोरणाची देखील माहिती घेऊन नगर विकास मंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना शंभूराज देसाई यांनी दिल्या. तसेच हा धोरणात्मक निर्णय असल्याने कॅबिनेट बैठकीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या.

यावेळी मंत्री शंभूराज देसाई, आ. प्रवीण दटके, सहसचिव विद्या हम्पय्या, पालिका आयुक्त अभिजित चौधरी आदि अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *