टॉप स्टोरी राजकारण

भिवंडीच्या सत्तेचा ‘सस्पेन्स’ संपला; भर्र रस्त्यात भाजपचा गड ढासळला, काँग्रेसच्या चाणक्यनितीने बंडखोर बसले गादीवर!

​विशेष प्रतिनिधी:भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत आज अशा काही नाट्यमय घडामोडी घडल्या की, भलेभले राजकीय पंडितही चक्रावून गेले. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना सत्तेची चावी कोणाकडे जाणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर भाजपच्याच घरातून फुटलेल्या बंडाने दिले आहे. भाजपचे बंडखोर नेते नारायण चौधरी यांनी काँग्रेस पुरस्कृत ‘सेक्युलर फ्रंट’च्या मदतीने महापौरपदावर कब्जा मिळवला असून, हा विजय म्हणजे भाजपसाठी मोठा राजकीय हादरा मानला जात आहे.

​९० जागांच्या या महापालिकेत काँग्रेसकडे ३० आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे १२ असे एकूण ४२ चे संख्याबळ होते. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला ४ मतांची निकड होती. मात्र, पडद्यामागे अशा हालचाली झाल्या की, भाजपचे तब्बल ९ नगरसेवक नारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली थेट ‘सेक्युलर फ्रंट’मध्ये सामील झाले. या अनपेक्षित बंडाने भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांचे महापौरपदाचे स्वप्न धुळीस मिळवले. चौधरी यांनी ४८ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले, तर भाजपच्या बालेकिल्ल्यातच त्यांना नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला.

​बदल्याचे राजकारण आणि सत्तेचे नवे समीकरण
​राजकीय वर्तुळात या विजयाची चर्चा ‘चंद्रपूरचा बदला’ म्हणून होत आहे. भाजपने यापूर्वी चंद्रपूरमध्ये काँग्रेसला जो धक्का दिला होता, त्याचीच परतफेड भिवंडीत झाल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या २२ नगरसेवकांपैकी ९ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून दिल्याने आता या बंडखोरांचे भवितव्य काय असेल, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही काँग्रेसप्रणित आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र असून, तिथेही भाजपला रिकाम्या हाताने परतावे लागण्याची शक्यता आहे.

​पोलीस छावणीत पार पडला लोकशाहीचा सोहळा
​निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहर आणि महापालिका मुख्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शंभर मीटरच्या परिसरात बॅरिकेडिंग करून ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचल्याने कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान प्रशासनासमोर होते, मात्र कडेकोट बंदोबस्तात ही प्रक्रिया शांततेत पार पडली.

​एकेकाळी भाजपची मजबूत पकड असलेल्या भिवंडीत काँग्रेसने ज्या पद्धतीने मित्रपक्ष आणि भाजपमधील नाराज गटाला एकत्र आणले, ती रणनीती आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *