खरी खरी संपादकीय

दादांची सावली की प्रतिमा

आज आपल्या महाराष्ट्राच्या यथोत्तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारले. हे पद स्वीकारताना त्यांनी जे भाषण केले ते एक अनुभवी महिलेचे होते असे वाटलेच नाही, त्यांनी दादांसारख्या वादळाबरोबर 40 वर्षे संसार केला. चाळीस वर्षांपूर्वी त्यांचे जे घराणे होते तेही राजकारण करणारेच होते त्यामुळे राजकारण पाहता पाहता बालपणापासून त्यांचे उभे आयुष्य गेलेले आहे. त्यांच्या आजूबाजूला एकच कारण होते आणि ते राजकारण होते. इंदिरा गांधी यांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर पंतप्रधान म्हणून शपथ घेतली नव्हती. लालबहादूर शास्त्री यांच्या अकाली निधनाने इंदिराजींना प्रत्यक्ष सत्ता पदावर चढावे लागले सुनेत्राताई दिल्लीतही फारशा बोलल्या नाहीत आणि आताही त्या अजून तरी दादांच्या शोक सावलीतून बाहेर पडलेल्या नाहीत असे वारंवार जाणवले.

इंदिरा गांधी यांना मधु लिमये यांनी ‘गुंगी गुडिया’ म्हणून संबोधले होते म्हणजे सुरुवातीला इंदिराजी ही फारशा बोलतच नसत. पण नंतरच्या काळात त्यांच्या राजकारणी घराण्याचा प्रकाश असा काही पडला की त्या अमेरिकेच्या निक्सनलाही सुनावून आल्या. आज दादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर झालेली सुनेत्रा ताईंची निवड स्वाभाविकच होती. त्या पदावर काही महत्त्वाकांक्षी राष्ट्रवादी राजकारणी डोळे लावून बसलेले होते, पण जसे उपमुख्यमंत्रीपद त्यांनाच म्हणजे सुनेत्रा ताईंनाच देणे क्रमप्राप्त होते तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना बहाल केले आहे. 90 च्या दशकात शरद पवार यांचे पुतणे म्हणून अजित पवार दिल्लीहून मुंबईला आले, तोपर्यंत बारामती त्यांच्याच गतीने आणि गतीने विकसित होत होती असे बारामतीकर म्हणतात. अजितदादा जेव्हा खरेच नव्हते असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना एक मंत्रीपद देण्यात आले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकही त्यांना दादाच म्हणायचे. आता सुनेत्रा ताईंनी गंभीरपणे आपल्या आसवांना बाहेर न येऊ देता दादांच्या आठवणीत राहून केलेले हृदयस्पर्शी भाषण राष्ट्रवादीच्या शिलेदारांना स्फूर्ती देणारे ठरलेले आहे.

काँग्रेसमध्ये जशी गांधी कुटुंबाची महत्ता आहे तशीच महत्ता महाराष्ट्रात पवार कुटुंबाची आहे. शरद पवार यांनी आपल्या कुटुंबाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि कौटुंबिक संबंध घट्टपणे राखून ठेवण्यासाठी जे जे केले ते स्पष्ट आहे. आज पदाध्यक्ष म्हणून सुनेत्रा ताईंनी जे पक्षासाठी दिशा दाखवणारे धोरणात्मक निवेदन केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दादांच्या छायेत वाढवणे हेच त्यांचे ध्येय आहे असे दिसले. आज त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांचा गौरवपूर्ण उल्लेख करून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पावलावर आपली पावले पडतील, हा समतावादी धोरणात्मक निर्णय कोणाचीही भीडभाड न ठेवता जाहीर केलेला आहे. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक म्हणून केला आणि त्यांनी जिजाऊंना स्वराज्य जननी म्हणून गौरविले. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या मंडळींना सोबत घेऊन राजकारण करणे हेच आपले ध्येय आहे हा अजित दादा यांनी जोपासलेला स्पष्टवक्तेपणा आपणही जोपासू हेही त्यांनी त्या ओघानेच सूचित केलेले आहे.

दादांच्या तेजाची किरणे आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकर्षाने दिसू लागली होती. 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्या सत्तर हजार कोटींमध्ये कोयना धरणापासून आतापर्यंतच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या पगाराचाही विषय होता, हे बहुतेकांना माहित माहिती नसेल. थोडक्यात दादांवर झालेले आरोप विरोधाला विरोध म्हणून होते हे आता स्पष्ट झालेले आहे. आता दादांच्या खुर्चीवर त्या म्हणजेच सुनेत्रा ताई आसनस्थ झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी दादांची सावली म्हणून आहे असे ज्यांना वाटते त्यांना सुनेत्राताई या दादांच्या प्रतिमाच आहेत असा अनुभव नक्कीच येईल, त्यांच्या आजच्या धोरणात्मक भाषणाकडे केवळ त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर महाराष्ट्राची जनताही त्यांच्याकडे आशने आणि आदराने बघणार आहे, असेच भविष्यकालीन चित्र दिसत आहे.

– श्रीकृष्ण चांडक

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *