अकोट अकोला जिल्हा

हक्कभंग प्रस्तावावरून अकोटमध्ये पत्रकारांचा संतप्त निषेध मोर्चा

पत्रकारांवर केलेल्या आरोपांची तात्काळ चौकशी करा..विधानसभा अध्यक्षांना निवेदन

आमदारांवर उलटला संतापाचा ज्वालामुखी!”संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटणार

अकोट | प्रतिनिधी:अकोला जिल्ह्यातील चार पत्रकारांविरोधात १२ मार्च रोजी अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावामुळे संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारितेच्या वर्तुळात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोने, साम टीव्हीचे अक्षय गवळी, दैनिक ‘वचक लोकशाहीचा’चे संपादक रविराज मोरे आणि महा व्हाईस न्यूजचे संजय आठवले यांच्याविरोधात अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव सादर केल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
आमदार भारसाकळे यांनी सभागृहात बोलताना लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हस्तकाने आपल्याला खंडणी मागितल्याची बातमी या पत्रकारांनी प्रकाशित केली, मात्र प्रत्यक्षात असा प्रकार घडलेलाच नसताना पत्रकारांनी ही बातमी दिली, असा आरोप केला. एवढ्यावरच न थांबता आमदारांनी या पत्रकारांवर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा, तसेच पोलिसांच्या नोंदीवर त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचा गंभीर ठपका ठेवत सभागृहात विधान केले. या वक्तव्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी या प्रकाराला पत्रकारितेवर दबाव आणण्याचा आणि पोलिस यंत्रणेवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न असे संबोधले आहे.

या पार्श्वभूमीवर अकोट येथे आज विविध पत्रकार संघटना एकत्र आल्या. शेकडो पत्रकार बांधवांनी एकत्रित येत आमदार भारसाकळे यांनी सभागृहात पत्रकारांवर केलेल्या गंभीर आणि बेछूट आरोपांची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी केली. याबाबत उपविभागीय अधिकारी अकोट यांच्या मार्फत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच सर्व सभागृह सदस्यांना निवेदन सादर करण्यात आले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर अशा प्रकारे गुन्हेगारीचे ठपके ठेवणे आणि सभागृहाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. जर या प्रकरणाची तात्काळ चौकशी झाली नाही तर पत्रकार संघटना राज्यभर तीव्र आंदोलन उभारतील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद आता केवळ अकोला जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नसून संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार संघटना आणि पत्रकार बांधव आक्रमक झाले आहेत. उद्यापासून मुर्तीजापूर, बाळापूर, दर्यापूर, अमरावतीसह राज्यातील विविध ठिकाणी निषेध आंदोलन उभारले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा वाद पुढील काही दिवसांत आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पत्रकारांवर करण्यात आलेल्या या आरोपांविरोधात चंचल पितांबरवाले, लक्ष्मी गावंडे, अनुरिती गुहे, पुष्पा तिहिले, नरेंद्र कोंडे, अरुण काकड, प्रभाकर बोरकर, मोहम्मद जुनेद, सरफराज अली, गणेश वाकोडे, देवानंद खिरकर, दीपक दाभाडे, अजबराव वानखडे, बाळकृष्ण तळी, सुगत वानखडे, विशाल आग्रे, अभिजीत सोळंके, राजेश साविकार, सुरेंद्र मोरे, राजकुमार वानखडे, धनु बायवार, मेघश्याम महाजन, राजू गावंडे, राजकुमार मुंडाले, अकबर खान, नरेंद्र सुईवाल, सै. शकील, निळकंठ वसु, डॉ. संतोष गायगोले, सुदेश रजाने, संजय बुध, बाळू दामोदर, डॉ. राजुभाऊ सुषिर, दयानंद तेलगोटे, विलास वानखडे आदी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *