‘आओ पधारो हमारे गाव’ म्हणत चोरांचे आणि अवैध विक्रेत्यांचे ‘शाही’ स्वागत!
अकोला: “हाथ कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या” — प्रत्यक्ष पुराव्याला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसते. अकोला रेल्वे स्थानकावरील विदारक स्थिती पाहता हे वाक्य तंतोतंत लागू पडते. रेल्वे पोलीस चोरीच्या घटना कमी झाल्याचा ‘कागदी’ दावा करत असले, तरी वस्तुस्थिती मात्र याच्या नेमकी उलट आहे. रेल्वे पोलिसांचा दरारा संपला की काय? असा संतप्त सवाल आता सामान्य प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
– अवैध विक्रेत्यांचे साम्राज्य: रेल्वे गाड्या आणि प्लॅटफॉर्मवर अवैध वेंडर्सनी उच्छाद मांडला आहे. कालच अकोला स्टेशनवर अनधिकृतपणे आइसक्रीम विकणाऱ्या २ वेंडर्सवर कारवाई करण्यात आली असली, तरी अशा अवैध वेंडर्सचा कायमस्वरूपी बंदोबस्त कधी होणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
– वाढती गुन्हेगारी: दोन दिवसांपूर्वीच स्टेशन परिसरात अशांतता पसरवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यातून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.
– चोऱ्यांचे जंक्शन: प्लॅटफॉर्म, तिकीट खिडकी आणि चक्क तिकीटघर समोरील परिसरापर्यंत चोरांचे हात पोहोचले असून, नुकत्याच घडलेल्या चोरीच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाचा कानाडोळा
विशेष म्हणजे, रेल्वे पोलीस चौकीपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर असलेल्या मुख्य गेटवर हे सर्व प्रकार दिवसाढवळ्या उघडपणे सुरू आहेत. जीआरपी (GRP) आणि आरपीएफ (RPF – मध्य रेल्वे) यांच्याकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किमान खबरदारीची अपेक्षा आहे. मात्र, दक्षिण मध्य रेल्वेच्या आरपीएफ प्रशासनाकडून तर आता प्रवाशांनी साधी अपेक्षा ठेवणेही सोडून दिले आहे, अशी संतापजनक स्थिती निर्माण झाली आहे.




