नवी मुंबई:घणसोली येथील नवी मुंबई महानगरपालिका बेघर निवारा केंद्र / रात्र निवारा केंद्र येथे हिंदू नववर्ष व गुढीपाडवा सण अत्यंत उत्साहात, आनंदी व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी पारंपरिक पद्धतीने “माणुसकीची गुढी” उभारण्यात आली. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, आपुलकी आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान केंद्रातील ३२ पुरुष, ५९ महिला आणि २ बालके यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गुढी पूजन केले. सर्वांनी एकत्र येत सण साजरा केल्याने एक कुटुंब असल्याची भावना निर्माण झाली. बेघर असलेल्या नागरिकांच्या जीवनात आनंदाचे, सन्मानाचे आणि आत्मीयतेचे क्षण निर्माण करण्याचा हा उपक्रम ठरला.
समाजसेवक निलेश सोमाजी कचरे यांच्या पुढाकारातून या सणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सर्व रहिवाशांसाठी पारंपरिक पुरणपोळीच्या जेवणाची विशेष व्यवस्था केली होती. सणाच्या निमित्ताने केंद्रात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे, अभिनेत्री बबिता भट्ट तसेच BARC माजी शास्त्रज्ञ विजयलक्ष्मी रविशंकर यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी स्वतः गुढी उभारून केंद्रातील रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्यासोबत सण साजरा केला. त्यांच्या उपस्थितीमुळे रहिवाशांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
उल्लेखनीय म्हणजे, हे निवारा केंद्र २०२४ च्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झाले असून, यंदा सलग तिसऱ्या वर्षी येथे गुढी उभारून सण साजरा करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प बेघर, निराधार व गरजू नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायी ठरत असून त्यांना सुरक्षित निवारा, अन्न व सन्मानाचे जीवन देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
यावेळी समाजसेवक निलेश कचरे म्हणाले की, “ज्यांचे या जगात कोणी नाही, ज्यांची अवस्था रस्त्यावर व फुटपाथवर अत्यंत दयनीय होती, अशा सर्वांना एक छताखाली सुरक्षित आसरा देत त्यांना आपुलकीचे घर देणे हेच खरे समाजकार्य आहे. माणुसकीची गुढी उभारून आपण नववर्षाची खरी सुरुवात करत आहोत.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निवारा व्यवस्थापक राहुल वाढे, काळजीवाहक (नर्स) वैशाली डोंगरे, सुरक्षा रक्षक मनोज म्हात्रे व चंद्रकांत पाटील यांनी विशेष सहकार्य केले. तसेच सानपाडा येथील रहिवासी तुषार बोंबे व मंगेश कदम यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.
हा उपक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, समाजातील दुर्बल घटकांना आधार देणारा, त्यांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा देणारा आणि “माणुसकी” जपणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.



