टॉप स्टोरी राजकारण

ठाकरे गटात ‘गृहयुद्ध’? किशोरी पेडणेकरांचे पंख छाटले; मातोश्रीच्या विश्वासू शिलेदारांमध्येच जुंपली!

विशेष प्रतिनिधी | मुंबई:​मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका विरोधी पक्षनेत्याची रवानगी ‘बिनखात्याच्या’ मंत्र्यासारखी करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवून त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घातल्याचा आव आणला गेला असला, तरी प्रत्यक्षात महत्त्वाच्या समित्यांपासून त्यांना दूर ठेवून त्यांचे राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न पक्षांतर्गत विरोधकांनी यशस्वी केल्याची चर्चा आहे.
​परंपरांना तिलांजली; ‘स्थायी’तून पेडणेकर आऊट!
दशकानुदशकाची अलिखित परंपरा सांगते की, महापालिकेचा विरोधी पक्षनेता हा स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य असतोच. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने या परंपरेला हरताळ फासला आहे. तिजोरीची चावी मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव आणि माजी अध्यक्ष यशोधर फणसे यांना घुसवून किशोरी पेडणेकरांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर महत्त्वाच्या निर्णयांचे केंद्र असलेल्या ‘सुधार समिती’तही विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य यांची वर्णी लागली आहे. यामुळे किशोरी पेडणेकर नावापुरत्या विरोधी पक्षनेत्या उरल्या असून, सत्तेची खरी सूत्रे ज्येष्ठ नगरसेवकांनी आपल्याच हातात राखल्याचे स्पष्ट झाले आहे.
​आसनव्यवस्थेवरून ‘हायव्होल्टेज’ ड्रामा
समित्यांतून डावलले गेल्याचा राग काढण्यासाठी की काय, किशोरी पेडणेकरांनी सभागृहातील आसनव्यवस्थेचा नवा ‘डाव’ टाकला आहे. सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांना पहिल्या बाकावर स्थान मिळावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. वरकरणी हे लोकशाहीला धरून वाटत असले तरी, यामुळे शिवसेनेच्याच तीन माजी महापौरांचा पहिल्या बाकावरचा हक्क हिरावला गेला आहे. विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आणि मिलिंद वैद्य या दिग्गजांना पहिल्या रांगेतून हुसकावून लावण्याच्या या खेळीमुळे पक्षात ‘मानापमान’ नाट्य रंगात आले आहे. स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना मागे सारून किशोरी पेडणेकर आता एमआयएम, काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून बसणार असल्याने शिवसैनिकांमध्येही संतापाची लाट आहे.
​नाराजीचा स्फोट अटळ?
विरोधी पक्षनेतेपद एकाला आणि समित्यांचे अधिकार दुसऱ्याला, अशा ‘डॅमेज कंट्रोल’च्या नादात ठाकरे गटात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. ज्येष्ठ नेत्यांची नाराजी थोपवण्यासाठी किशोरी पेडणेकरांचा बळी दिला जातोय की, पेडणेकरांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी ही खेळी खेळली जात आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. एकीकडे बाह्य शत्रूंशी लढताना आता मातोश्रीला आपल्याच घरात सुरू झालेली ही धुसफूस कशी शांत करायची, याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *