घातपात की अपघात? अजित पवारांच्या विमान दुर्घटनेत रोहित पवारांचे खळबळजनक दावे; ब्लॅक बॉक्स, ‘वीसीआर’ कंपनी आणि विम्यावर संशयाची सुई!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ अधिक गडद होत असून, आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावरून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. “हा अपघात नसून नियोजित घातपात असावा,” असा गंभीर संशय व्यक्त करत त्यांनी नागरी उड्डाण मंत्रालय आणि संबंधित खासगी विमान कंपनीवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी उपस्थित केलेले ५ महत्त्वाचे मुद्दे:
१. ब्लॅक बॉक्स जळण्यावरून संशय:
“ब्लॅक बॉक्स ११०० सेल्सिअस डिग्रीपर्यंतची आग आणि प्रचंड दबाव सहन करू शकतो. जिथे विमानातील साधे कागद जळाले नाहीत, तिथे एवढी मजबूत यंत्रणा जळाली कशी?” असा सवाल रोहित पवार यांनी केला. नागरी उड्डाण मंत्रालयाने काल घाईघाईत माहिती देऊन काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
२. विमानाची रचना आणि इंधन:
विमानात क्षमतेपेक्षा जास्त इंधन भरले होते आणि त्यात अतिरिक्त इंधन टाक्या (Additional Fuel Tanks) होत्या, असा दावा रोहित यांनी केला. “विमान रनवेवर न पडता मातीत पडले, तरीही मोठा स्फोट होण्याचे कारण हे अतिरिक्त इंधनच होते. या टाक्या टॉयलेटच्या जवळ असतात आणि तिथेच ब्लॅक बॉक्सही असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
३. ३५ कोटींचे विमान अन् ५५ कोटींचा विमा:
विमा कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर बोट ठेवत रोहित पवार म्हणाले, “ज्या विमानाची बाजारभावाप्रमाणे किंमत आज १०-१५ कोटी रुपये आहे, त्याचा विमा (Insurance) ५५ कोटींचा काढण्यात आला होता. लायबिलिटी विमा २१० कोटींचा आहे. या मोठ्या रकमेसाठी तर हा प्रयत्न नव्हता ना? याची चौकशी व्हायला हवी.”
४. वैमानिकाची भूमिका आणि नियमांचे उल्लंघन:
संबंधित कंपनीचे वैमानिक सुमित कपूर आणि रोहित सिंग हे वेगवेगळ्या प्रकारची विमाने (लिगसी आणि लेअरजेट) उडवत होते, ज्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. ‘डीजीसीए’च्या नियमांना हरताळ फासून हे काम सुरू होते. तसेच, वैमानिकाने संकटकाळी मुंबई विमानतळावर परतण्याऐवजी बारामतीतच लँडिंगचा आग्रह का धरला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
५. मालक आणि व्यवस्थापक बेपत्ता?
अपघात झाल्यानंतर कंपनीचा ‘अकाऊंटेबल मॅनेजर’, सेफ्टी प्रमुख आणि ट्रेनिंग डायरेक्टर हे तिघेही जबाबदार असतात, मात्र ते सध्या कुठे आहेत? असा सवाल करत त्यांनी तपास यंत्रणांनी केवळ कागदपत्रांवर विश्वास न ठेवता सीसीटीव्ही आणि ईमेलचे पुरावे तपासावेत, अशी मागणी केली आहे.
रोहित पवारांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता तपास यंत्रणा या तांत्रिक आणि आर्थिक बाबींकडे कोणत्या कोनातून पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—
Deepak Kaitke




