सातासमुद्रापार दुमदुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष; अंदमानच्या किनाऱ्यावर रामदास आठवलेंच्या उपस्थितीत शिवगर्जना!
पोर्टब्लेयर | विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा आणि विचारांचा वारसा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, तो आता सातासमुद्रापार अंदमान-निकोबार बेटांवरही मोठ्या दिमाखात पोहोचला आहे. ऐतिहासिक पोर्टब्लेयर (दीपनगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६ वा जयंती महोत्सव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. अंदमानच्या किनाऱ्यावर पहिल्यांदाच शिवरायांच्या नावाचा असा जयघोष घुमल्याने स्थानिकांमध्ये कुतूहलाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या खास निमित्ताने पोर्टब्लेयरमधील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने मराठी तरुण-तरुणींनी एक भव्य ‘एकता यात्रा’ आणि चित्तथरारक बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
या शोभायात्रेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी अंदमान-निकोबारचे खासदार विष्णू पद रे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहुल राम, प्रमोद काकडे तसेच महाराष्ट्र मंडळाचे गोरखनाथ पाटील, सुनीता पाटील, दास गुप्ता आणि अरविंद पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पारंपारिक वेशभूषा, भगवे ध्वज आणि ‘शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी पोर्टब्लेयरचे रस्ते अक्षरशः न्हाऊन निघाले होते.
अंदमानसारख्या केंद्रशासित प्रदेशात शिवजयंतीचा हा सोहळा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरला असून, तेथील मराठी बांधवांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे अंदमानच्या भूमीवर शिवरायांच्या विचारांची नवी प्रेरणा रुजली असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.




