टॉप स्टोरी महाराष्ट्र विदर्भ

मार्कंडेश्वर मंदिराच्या विकासासाठी मुनगंटीवारांची ‘डेडलाईन’ फिक्स! २६ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे ‘मिशन मोड’वर आदेश

मुंबई: विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतील ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानाचा कायापालट करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कंबर कसली आहे. “मार्कंडा मंदिराची विकासकामे संथ गतीने चालणार नाहीत, ती ‘मिशन मोड’वर घेऊन २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा,” असे खडे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.

मार्कंडा देवस्थानच्या संवर्धन व परिसर विकासासाठी १४ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर असून, या कामांची अंमलबजावणी वेळेत व्हावी यासाठी मुनगंटीवार यांनी आता थेट ‘त्रिसदस्यीय समिती’ नेमण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती दर आठवड्याला कामाच्या प्रगतीची पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे, कामाच्या दुसऱ्या टप्प्याला तीन वर्षे उशीर झाल्याबद्दल त्यांनी एमएसआरडीसी (MSRDC) कडून लेखी अहवाल मागवला असून, दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.

मंदिराच्या प्राचीन वास्तूशैलीला धक्का न लावता शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करणे आणि भाविकांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हा या आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. मंदिर परिसरातील १०० मीटर क्षेत्रात कोणतेही अतिक्रमण होऊ नये, यासाठी ग्रामसेवकांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व ओळखून केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनाही गडचिरोलीत निमंत्रित करण्यात येणार आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. मुनगंटीवारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता मार्कंडा देवस्थानच्या कामाला मोठी गती मिळणार असून, गडचिरोलीच्या पर्यटन विकासालाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *