टॉप स्टोरी राजकारण

आमदारकी निसटली, महापालिकेची ‘लास्ट चान्स’!

विधानसभेत पराभूत चेहरे BMC रणांगणात; मुंबईत सहा ‘कमबॅक’ उमेदवार केंद्रस्थानी

विशेष प्रतिनिधी | मुंबई:विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारलेले काही परिचित चेहरे आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राजकीय पुनरागमनाचा निर्णायक डाव टाकताना दिसत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवून, विविध पक्षांतील सहा माजी विधानसभा उमेदवार थेट नगरसेवक पदासाठी मैदानात उतरले आहेत, तर दोन माजी आमदारांनी आपल्या वारसदारांना पुढे केले आहे. त्यामुळे “विधानसभेत नापास झालेले चेहरे महापालिकेत पास होतील का?” हा सवाल मुंबईच्या राजकारणात ऐरणीवर आला आहे.

पराभवानंतरची नवी मांडणी; महापालिका हा कमबॅकचा मंच

२०२४ मध्ये मुंबईत झालेल्या विधानसभा निवडणुकांत अनेक ओळखीचे चेहरे मतदारांसमोर होते. मात्र अपेक्षित निकाल न लागल्याने काहींना जनतेचा नकार स्वीकारावा लागला. आता हेच नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून आपली राजकीय पकड टिकवण्याचा आणि पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदारकी हुकली असली, तरी नगरसेवककीच्या माध्यमातून सत्ता-समीकरणात राहण्याची धडपड स्पष्टपणे जाणवते.

पक्ष बदल, नवे तिकीट; नवी आशा?

भायखळा विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांनी आता शिवसेना (शिंदे गट) कडून प्रभाग २०९ मधून उमेदवारी घेतली आहे.
कुर्ला मतदारसंघात अपयश आलेल्या प्रविणा मोराजकर या शिवसेना (ठाकरे गट) तर्फे प्रभाग १६९ मधून निवडणूक लढवत आहेत.
घाटकोपर पूर्वेतून पराभूत झालेल्या राखी जाधव यांना यावेळी भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग १३१ साठी उमेदवारी देण्यात आली आहे.

तोच पक्ष, दुसरी संधी; काहींचा हट्ट कायम

वडाळा विधानसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारलेल्या श्रद्धा जाधव या पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून प्रभाग २०२ मधून मैदानात उतरल्या आहेत.
२०१९ मध्ये वर्सोवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून पराभूत झालेल्या राजुल पटेल यांना आता शिवसेना (शिंदे गट) कडून प्रभाग १६१ मधून संधी देण्यात आली आहे.
विक्रोळी मतदारसंघातून मनसेकडून पराभूत झालेले विश्वजित ढोलम पुन्हा मनसेकडूनच प्रभाग ११९ मधून लढत देत आहेत.

माजी आमदारांची पुढची पिढीही रिंगणात

विधानसभेतील पराभवानंतर काही माजी आमदारांनी यावेळी स्वतः न उतरता कुटुंबातील सदस्यांना राजकीय वारसा पुढे देण्याचा निर्णय घेतला आहे.
दहिसर मतदारसंघातून पराभूत झालेले विनोद घोसाळकर यांचा मुलगा सौरभ घोसाळकर शिवसेना (ठाकरे गट) कडून प्रभाग ७ मधून निवडणूक लढवत आहे.
माहीम मतदारसंघातून पराभूत झालेले सदा सरवणकर यांच्या मुलगी प्रिया गुरव या शिवसेना (शिंदे गट) कडून प्रभाग १९१ मधून रिंगणात उतरल्या आहेत.

मुंबईकरांचा कौल कोणाला?

विधानसभेत संधी न मिळालेले चेहरे महापालिकेत कितपत स्वीकारले जातात, याचा फैसला आता थेट मुंबईकर मतदार करणार आहेत. अनुभव, ओळख आणि जुना प्रभाव चालणार की नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा संदेश मतपेटीतून मिळणार—याचे उत्तर निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
महापालिकेची ही लढत केवळ प्रभागापुरती मर्यादित नसून, काहींसाठी राजकीय पुनर्जन्माची तर काहींसाठी अखेरची परीक्षा ठरणार आहे. मुंबईच्या सत्ताकारणात पुन्हा आपले स्थान निर्माण करण्याचा हा डाव यशस्वी ठरणार की अपयशी, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *